Loksatta | शंभरीतलं शहाणपण!

Mar 23, 2024
Article

SHARE

भाषांतर संपदा सोवनी
आयुष्य तर जगायचंच असतं, परंतु ते आनंदी आणि ‘ग्रेसफुली’ कसं जगायचं हे प्रत्येकाच्या विवेकावर अवलंबून असतं. नुकत्याच शंभरीत पदार्पण केलेल्या दुर्गाबाई निलेकणी यांनी काळाबरोबर चालताना मायक्रोवेव्ह, झूम कॉलसारख्या अनेक आधुनिक गोष्टी तर शिकून घेतल्याच, शिवाय अत्याधुनिक अशा दीर्घायुष्यासाठीच्या संशोधनासाठीही त्या तयार झाल्या आहेत. ‘इतरांवर ओझं होणार नाही असं जगावं!’ हे त्यांचं ‘शंभरीतलं शहाणपण’ तर सगळ्यांसाठीच अनुकरणीय… सूनबाई रोहिणी निलेकणी यांच्या लेखणीतून उतरलेलं त्यांचं हे शब्दचित्र.

माझ्या सासूबाई- दुर्गाबाई निलेकणी- ‘अम्मा’ यांनी नुकतंच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केलं. वयामुळे उद्भवणाऱ्या काही तक्रारी सोडल्या, तर त्या चालत्याफिरत्या आहेत. आरोग्य उत्तम आणि मन शांत. त्यांना कधीही विचारलं, ‘‘कशा आहात?’’ तर म्हणतात, ‘‘मी ठीक!’’ तर कधी हसून म्हणतात, ‘‘एकदम ठीक!’’ अगदी कधी श्वास घेताना त्रास होत असला किंवा काही दुखतखुपत असेल, तरीही त्यांचं उत्तर हेच असतं.

त्यांचं जीवन हे, ‘आयुष्य ‘ग्रेसफुली’ कसं जगावं’ याचं प्रात्यक्षिकच आहे जणू! कधी मलाच निराश वाटतं, तेव्हा मी त्यांना म्हणते, ‘‘अम्मा, तुम्ही अशा कशा आहात?’’ त्या म्हणतात, ‘‘सोप्पं आहे! मी मृत्यूची कधी फिकीर करत नाही. जगण्याचा विचार करते. आणि मी आनंदी आहे!’’ साधी, आहे त्यात सुखी राहण्याची एक संस्कृती होती (कधीच नाहीशी झालीय ती!), ती दुर्गाबाईंमध्ये पुरेपूर आहे. त्यांचे वडील- डॉ. अण्णाजी राव सिरूर. कर्नाटकातल्या धारवाडमधले ते मोठे डॉक्टर. चौदा भावंडं आणि असंख्य नातेवाईकांच्या गराड्यात अम्मा वाढल्या. कुटुंब खाऊनपिऊन सुखी असलं, तरी गाठीशी फार काही उरायचं नाही. एखादी गोष्ट वाया जाण्याची शक्यता असेल, तर मुळात ती मागून घेऊच नका, हा घरातला दंडक. धारवाडच्या घरात प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटचा तुकडा, चिंधी, याचाही काही तरी उपयोग असे. आजच्या ‘यूझ अँड थ्रो’ काळात हे समजणंही अनेकांना अवघड जाईल. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ हा फक्त सुविचार नव्हता, लोकांच्या जगण्याचा धर्म होता तो! तसंच ‘माणुसकी’ ही पुस्तकी संकल्पना नव्हती. कुणी कधी मदतीसाठी दार ठोठावलं, तर शक्य ती मदत करायची, हे गृहीत होतं. एकदा अम्मांच्या एका पुतण्याला वैद्याकीय उपचारांसाठी पैसा लागणार होता. अम्मांनी त्यांच्याजवळचे जवळपास सगळे पैसे देऊन टाकले नि वर ‘माझी मुलं बघतायत माझ्याकडे, मग मला वेगळा पैसा कशाला हवा?’ असं म्हणून खांदे उडवले होते! आता कुणाविषयीही माणुसकीच्या आधी संशय मनात येण्याचा जमाना आहे. अगदी शेजारच्या घरात राहणाराही खूपदा अनोळखीच असतो, असा काळ. त्यात अम्मांसारखी माणसं दुर्मीळच!

१०० वर्षं. केवढे बदल पाहिलेत त्यात अम्मांनी! मानवी इतिहासातले अतिशय समृद्ध क्षण त्या जगल्यात. जागतिक महायुद्ध, स्वातंत्र्यलढा… तंत्रज्ञानात झपाट्यानं झालेले बदल, देशाची प्रगती… आर्थिक समृद्धी आणि चणचण… जवळच्यांचे मृत्यूही खूप पाहिले त्यांनी- पती मोहनराव निलेकणी आणि अम्मांची अनेक भावंडं, यांचे. सगळ्यातून त्या तरल्या. पूर्वी चुलीवर भाकरी करण्याची किंवा आप्तांना पोस्टकार्ड लिहिण्याची सवय असलेल्या अम्मा मायक्रोवेव्ह वापरताना किंवा ‘झूम’ कॉलवर बोलतानाही तितक्याच सहजतेनं ती गोष्ट करतात. ‘जुळवून घ्यायला हवं. नाही का?’ साध्या, स्पष्ट स्वरात त्या सांगतात. एका गोष्टीशी मात्र त्यांना जुळवून घेता आलं नाही- महागाई, चलनवाढ! खरं तर आता त्यांना स्वत:ला पर्स उघडण्याची वेळ येत नाही, पण कधी बोलताना रोजच्या वस्तूंच्या किमती माझ्याकडून कळल्या की त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटतात. म्हणतात, ‘‘गरीब लोक कसं भागवत असतील?…’’

त्यांच्या वयाचा उल्लेख झाला कीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर असाच आश्चर्यचकित भाव असतो. ‘‘देव मला विसरलाय की काय?’’ असं मिश्कीलपणे विचारतात. मग मी म्हणते, ‘‘नव्याण्णव नॉट आऊट आहात तुम्ही. म्हणजे सेंच्युरी होणार नक्की!’’ त्यावर होकार देताना खळखळून हसतात.

१९२५ मध्ये त्यांचा जन्म झाला. तेव्हा आपल्या भारतीय उपखंडात सरासरी जीवनमान अवघं २७.६ वर्षं होतं! आज ते दुपटीपेक्षा अधिक झालंय- सरासरी ६७.२ वर्षं. म्हणजे पुढच्या काही वर्षांत देशाचं वय झपाट्यानं वाढणार. ‘इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३’नुसार २०५० पर्यंत ६० वर्षं किंवा त्यावरच्या वयाच्या नागरिकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २०.८ टक्के होण्याची चिन्हं आहेत. म्हणजे जवळपास ३५ कोटी लोक. अमेरिकेच्या लोकसंख्येएवढा आकडा आहे हा! २०२२ मध्ये १४.९ कोटी ज्येष्ठ नागरिकांची नोंद झाली होती- म्हणजे लोकसंख्येच्या १०.५ टक्के. याचाच अर्थ आज आपण जे देशाच्या तरुण लोकसंख्येविषयी बोलतो, ते चित्र २०५० पर्यंत जुनं होणार आहे. तेव्हा आपलं लक्ष आरोग्य, मानवकल्याण, आहे त्या मनुष्यबळाची कार्यक्षमता कशी वाढवायची? सर्व ज्येष्ठांना निवृत्तीनंतरचे फायदे, निवृत्तिवेतन देण्याचा आर्थिक भार कसा उचलायचा? यावर असेल. अनेक देशांपुढे अशीच आव्हानं असतील. म्हणजे मानवजातीला वृद्धत्वाच्या आव्हानांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच सामना करावा लागेल.

काही अंदाजांनुसार जगात सध्या ५ लाखांच्या आसपास लोकांनी शंभरी गाठली आहे. पाश्चिमात्य देशांत दीर्घायुषी असण्याबद्दल संशोधन वेगानं सुरू आहे. अम्मांच्या अगदी विरुद्ध, सिलिकॉन व्हॅलीमधले काही कोट्याधीश दीर्घायू होण्याचं रहस्य जाणून घ्यायला उत्सुक आहेत. त्यातल्या एकानं तर मृत्यूला जीवनाचा भाग मानायलाच नकार दिलाय. त्याच्या मते मृत्यू हा कंप्युटरमध्ये एखादा ‘बग’ येतो ना, तसा मानायला हरकत नसावी! ‘मेथुसेलाह फाऊंडेशन’चं असं म्हणणं आहे की, २०३० पर्यंत वय वर्षं ९० हे वय ५० सारखं वाटावं. हा सर्व प्रयोग प्रत्यक्षात फसेल असंच अनेकांना वाटतंय, पण त्यातून डिमेन्शिया (विस्मरण) आणि वयाशी संबंधित इतर समस्यांवर काही उपाय सापडू शकेल.

अम्मासुद्धा अशा एका संशोधनाचा भाग होणार आहेत. ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्सेस’च्या ( NIMHANS) एका प्रकल्पासाठी आपलं रक्त चाचणीला द्यायला त्या तयार झाल्यात. ज्येष्ठ नागरिकांत शरीरातल्या पेशी मरतात कशा, पुन्हा पूर्ववत कशा होतात, असा त्याचा विषय आहे. संशोधनाला उपयोग होणार असेल तर मृत्यूपश्चात देहदान करण्यासाठीही अम्मा तयारी दाखवतात.

अम्मांच्या शंभराव्या वाढदिवसाचे बेत आम्ही करत असतो. मी एकदा त्यांना विचारलं, ‘‘लोकांनी किती जगायला हवं?’’ त्या म्हणाल्या, ‘‘इतरांवर ओझं होणार नाही इतकं! पण ते आपल्या हातात नाहीये… नाही का?!’’ नुसतं एकेक वर्ष पुढे जात वय न वाढलेल्या, तर खरोखर रसरसून ते जगलेल्या शंभरीच्या व्यक्तीचे हे शब्द, किती सार्थ!

KEYWORDS

YOU MAY ALSO WANT TO READ

Mar 08, 2024
Article
Durgabai Nilekani recently entered the 100th year of her life. My mother-in-law is in good health, physically active, and mentally calm. She has mild cognitive impairment and some age-related decline. [...]
Oct 10, 2023
Others
The Centre for Brain and Mind was launched in collaboration with National Centre for Biological Sciences (NCBS) with the contribution of Rs 100 crore from Rohini Nilekani Philanthropies. National Institute [...]
Jul 04, 2023
Others
An outcome of the INR 100 Crores grant given to NCBS and NIMHANS to further long-termresearch and build capacity for both research and practice in the mental health field. Bangalore, [...]